कन्हान, ता. १८ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
कन्हान, कोलार व पेंच नदीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी कामठी, कन्हान, पिपरी, कांद्री, टेकाडी तसेच परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पहाटे ३ वाजता प्रकाश सिरीया व जयराम पारवानी यांच्या हस्ते शिवलिंगाचा दूध, दही व जलाने अभिषेक करण्यात आला. काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली.
दिवसभर मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला, पुरुष, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्गाची व्यवस्था केली होती. स्वयंसेवक व पोलिस बंदोबस्तामुळे सुरक्षेची काटेकोर खबरदारी घेण्यात आली होती.
मंदिर परिसरात स्थानिक नागरिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने फराळ व चहाची सोय करण्यात आली होती. भजन, कीर्तन, मंत्रोच्चार व घंटानादामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य खुलून दिसत होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची वर्दळ कायम होती.
सोमवारी (दि. १६) सकाळी केजाजी महाराज भजन मंडळाचे भजन तसेच ह.भ.प. उमेश महाराज बहरुपी यांचे कीर्तन झाले. महाप्रसाद वितरणाने दोन दिवसीय महोत्सवाची सांगता झाली.
दरम्यान, जीवन रक्षक दल शाखा, जुनी कामठी यांच्या वतीने कन्हान नदी परिसरात विशेष दक्षता घेण्यात आली. अध्यक्ष राजेश सहारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नदीकाठावर उपस्थित राहून यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

