४० वर्षांच्या आठवणींचा सुवर्णसोहळा : डी.एड प्रथम बॅचचे भावनिक स्नेहसंमेलन

शिक्षक घडविणाऱ्या मातृसंस्थेच्या अंगणात पुन्हा उमलला स्नेह, संस्कार आणि शिक्षणाचा ध्यास “जिथे अक्षरांची ओळख झाली, जिथे शिक्षक घडले, त्या मातृसंस्थेच्या आठवणी कधीही पुसल्या जात नाहीत,” या भावनेचा प्रत्यय देणारा स्व. बिनाबाई माहुरे डी.एड कॉलेज, स्टेशन रोड, कन्हान येथील डी.एड प्रथम बॅच (१९८४–८६) च्या माजी विद्यार्थ्यांचा ४० वर्षांनंतर आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

कन्हान, ता. १० :

  • Save

सोमवार (दि. ९ फेब्रुवारी २०२६) रोजी कृष्णराव लॉन, तारसा रोड, कन्हान येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाने केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही, तर शिक्षणाचे सामाजिक महत्त्व, शिक्षकांची जबाबदारी आणि आयुष्य घडविण्यातील शिक्षणाची भूमिका यावरही सखोल चिंतन घडविले.

कार्यक्रमाचे उद्घाटन इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बनकर सर यांच्या अध्यक्षतेखाली माजी सभापती मा. देवरावजी माहुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव बांते, प्रकाश नाईक, सौ. छायाताई नाईक, वासुदेव चिकटे, मनोहरराव कोल्हे, मुख्याध्यापक प्रवीणकुमार साबळे आणि श्रीमती आगाशे मॅडम यांची उपस्थिती लाभली.

शेख सर व शेख मॅडम यांच्या सुमधुर स्वागतगीताने कार्यक्रमाला भावस्पर्शी सुरुवात झाली. प्रास्ताविकात गुंडेराव ठाकरे सर यांनी डी.एडच्या काळातील शिस्त, संस्कार आणि शिक्षक घडविण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख करत उपस्थितांना भावूक केले. “आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, त्यामागे शिक्षक म्हणून घडविणाऱ्या या संस्थेचे ऋण आहे,” अशी कृतज्ञ भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

४० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव, समाजासाठी केलेले कार्य, आयुष्यातील सुख-दुःख आणि शिक्षक म्हणून निभावलेली जबाबदारी यांचे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून घडविलेली माणसे, समाजात निर्माण केलेली जागरूकता आणि शिक्षणातून दिलेले संस्कार हेच आपल्या आयुष्याचे खरे यश असल्याची जाणीव यावेळी प्रकर्षाने झाली. अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताना दिसले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह तसेच पर्यावरणपूरक पुष्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. सहकुटुंब उपस्थिती आणि स्नेहभोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता आनंदमयी वातावरणात झाली.

  • Save

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता मदने यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपक टुले यांनी मानले. या सुवर्णसोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी छापानी मोहन, पुंडलिक राघोर्ते, कृष्णा आगाशे, गोविंदा किरपाने, प्रभाकर ठाकरे, दिलीपसिंग बागडी, गौतम ठवरे, सुधाकर मस्की, सुधाकर भोयर, राजेंद्र वाहणे, किसन टीकम, विद्या माहुरे, प्रभा झाडे, अल्का गिरडकर, प्रमिला दुधपचारे, जयश्री बावनकर यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

४० वर्षांनंतर पुन्हा एकदा मातृसंस्थेच्या स्नेहछायेत एकत्र येत, शिक्षक म्हणून समाजघडणीची शपथ नव्याने दृढ करण्याचा हा सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link