मध्यरात्री नाकाबंदीत गोवंश वाहतूक उघड; आरोपी ताब्यात
कन्हान शहर हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका परिसरात, तारसा पुलाखाली मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गुरुवार, (दि.८) जानेवारी पोलिसांनी गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणत मोठी कारवाई केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एम.एच. २७ बीएक्स ८८६० क्रमांकाच्या वाहनातून गोवंश कत्तलखान्याकडे नेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून संबंधित वाहन अडविले.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये नऊ गोवंश अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या गोवंशांची अंदाजे किंमत सुमारे २ लाख २५ हजार रुपये असून, वाहनाची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाहनचालक आशिष मोशीन कुरेशी याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र, गोवंश वाहतुकीबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई केवळ कायदेशीर नव्हे, तर मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी ठरली. मुक्या प्राण्यांना कत्तलीपासून वाचविण्यात पोलिसांना यश आले असून, समाजातील विविध स्तरांतून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. गोवंश संरक्षणासंदर्भात शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
या यशस्वी कारवाईत डी.पी. पथकाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक हारगुडे, हवालदार अमित यादव, हरीश सोनवणे, वाहतूक अधिकारी अनिल यादव, सतीश तालेवार, एपीआय बावनकर, अरविंद गजभिये, जीवन विघे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गोवंश वाहतुकीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

