कन्हान, ता. १८ छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कन्हान शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी याबाबत कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात पक्षाचे नेते तथा कन्हान नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी कन्हान पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक वैजयंती मडवधरे यांना निवेदन सादर केले. निवेदनात सकपाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकपाळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला असून, राज्यभरात संताप व्यक्त होत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
“महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे विधान समाजात तेढ निर्माण करणारे असून अत्यंत बेजबाबदार आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा कन्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
निवेदन देताना नागपूर ग्रामीण जिल्हा महासचिव अशोक पाटील, सुनील लाडेकर, रोहित मानवटकर, कन्हान शहर अध्यक्ष रजनीश मेश्राम, संदीप कभे, हरीश खंगारे, स्वप्निल वाघधरे, राजेंद्र हटवार, मनोहर मेश्राम, मुकेश करसोलिया, माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, संगीता खोब्रागडे, स्वाती पाठक, शशिकला बागळे, रेखा धगट, आशा छलिया यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नसून पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

