कन्हान, ता. १८ नाभिक एकता मंच पारशिवनी तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कन्हान येथे उत्साहपूर्ण व दिमाखदार मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार (दि. १८ फेब्रुवारी २०२६) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत तारसा रोड चौकात देशभक्ती, शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारा अविस्मरणीय सोहळा पार पडला.
जय भवानी दांडपट्टा खंडाळा (घ) येथील मास्टर सागर नवघरे यांच्या सहकार्याने भव्य दांडपट्टा आणि पारंपरिक युद्धकलेचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. लहान मुलांनीही आपल्या अंगी असलेल्या कलेचे प्रभावी प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाने क्षणभर प्रेक्षकांना शिवकालीन रणांगणात नेले. मुलांच्या अंगातील जोश, शिस्त आणि पराक्रम पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.
सायंकाळी ८ वाजता नाभिक समाजाच्या वतीने महाराजांना भव्य मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी जन्मोत्सव समिती, कन्हान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाभिक समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. संपूर्ण परिसर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. स्वराज्य स्थापनेचा ध्यास, शौर्य, दूरदृष्टी, स्त्रीसन्मान आणि सर्वधर्मसमभाव या त्यांच्या कार्यातील वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला. प्रसंगी पराक्रमी मावळे जिवाजी महाले यांची प्रतिमा भेट देऊन अभिवादन करण्यात आले.
शिवकालीन शौर्याची आठवण करून देताना महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक व पराक्रमी मावळे जिवाजी महाले यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. ‘जीवा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिवाजी महाले यांनी प्रतापगडाच्या लढाईत सय्यद बंडाचा घातक वार स्वतःवर झेलून महाराजांचे प्राण वाचवले होते. त्याग, निष्ठा आणि स्वामीभक्तीचे हे उदाहरण आजही प्रेरणादायी ठरते.
“आम्ही मावळे जिवाजी महाले व शिवा काशीद” अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा दिला. कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

