पारशिवनी, ता. ८ :
ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे कार्यकर्ता मेळावा तसेच राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम बुधवारी (दि. ७ जानेवारी २०२६) रोजी हरिहर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पारशिवनी येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने करण्यात आली.
या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष शामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, प्रवासी महासंघ अध्यक्ष नितीन मुकेवार, स्वाती मुकेवार, नागपूर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला माकडे, नागपूर ग्रामीण सचिव नथुजी वाढरे, संपर्क प्रमुख विधी जयस्वाल, रामटेक तालुका अध्यक्ष मोरेश्वर माकडे, सहसचिव भावना क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात कन्हान शहरातील शहीद वीर प्रकाश देशमुख यांच्या मातोश्री लीलाताई देशमुख तसेच बंधू प्रदीप देशमुख यांचा पुष्पगुच्छ, शाल व ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सन्मानचिन्ह देऊन हृदय सत्कार करण्यात आला. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांचा गौरव करताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर अभिमान व कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून आली.
याचवेळी कन्हान येथील सामाजिक कार्यकर्त्या व वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत डॉक्टर स्वाती वैद्य यांचा रुग्ण हक्क संहितेनुसार रुग्णांना प्रामाणिक व संवेदनशील सेवा देत असल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संताजी अखिल तेली सामाजिक संघटनेचे नागपूर जिल्हा प्रचार प्रमुख सूर्यभान चकोले यांनाही गौरविण्यात आले.
तसेच विविध क्षेत्रांत नेतृत्वगुण दाखविणाऱ्या पारशिवनी तालुका अंगणवाडी सेविका अध्यक्ष सुनिता मानकर व रास्त भाव दुकानदार स्वप्निल मानकर यांनाही ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास विष्णू डहाके, श्रीराम सातपुते, पारस माकडे, बबिता कोठेकर, कैलास वाडीभस्मे, नीता इटनकर, मीना इंदूरकर, श्री. कांबळे, प्रवीण चव्हाण, केशव केने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्यकर्ते, साधक, शिक्षक तसेच हरिहर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

