कन्हान, ता.१३ नगर पंचायत कांद्री (कन्हान) प्रशासनाने थकीत घरकर व इतर करांवर २ टक्के प्रतिमहिना व्याज आकारण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांच्या वतीने नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत अनेक नागरिक आर्थिक अडचणीतून जात आहेत. अशा वेळी थकीत करांवर २ टक्के प्रतिमहिना दराने व्याज आकारणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी जाचक ठरणार आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ कमी करावा किंवा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत (डिस्काउंट/रिबेट) योजना जाहीर करावी. थकीत कर भरणाऱ्यांसाठी व्याजमाफी किंवा विशेष सवलत योजना लागू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
नगर पंचायत प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी बलवंत पडोळे, राजू देशमुख, नगरसेवक निकेश मेश्राम, महेश झोडावणे, गणेश सरोदे, अभय जांबूतकर, धर्मराज मनगटे, इंद्रपाल सुखदेवे, पुंडलिक गिरे, मुकेश गिरे, गजानन जैसारे, सिद्धार्थ गजभिये आदी नागरिक उपस्थित होते.

