३७ जनावरांची सुटका; ३१.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
कन्हान, ता. २० :
जबलपूर रोडकडून नागपूरकडे कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक करणारा १२ चाकी कंटेनर ट्रक स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पकडला. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून ३७ गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. तसेच ट्रकसह एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवार (दि. १९) रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी, सहायक फौजदार विनोद काळे, पोलीस हवालदार प्रमोद भोयर व पोलीस नाईक संजय बरोदिया यांचे पथक कन्हान परिसरात गस्त घालत होते. यावेळी गोवंश तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बोर्डा टोलनाका येथे नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान नागपूरच्या दिशेने येणारा १२ चाकी कंटेनर ट्रक (क्रमांक एमएच ०४ एचडी ९५६९) थांबवून पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरच्या मागील भागात ३७ जनावरे दोरखंडाने बांधलेली, कोणतीही खाण्या-पिण्याची व्यवस्था न करता अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबलेली आढळून आली.
ट्रक चालक शोहेब शहजाद पठाण (वय ३२, रा. खांदपूर, ता. व जि. उरैया, उत्तरप्रदेश) याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील परवाना व इतर कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही वैध दस्तऐवज नसल्याचे निष्पन्न झाले. जनावरांची कत्तलीसाठी धोकादायक व बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने चालकास अटक करण्यात आली.
या कारवाईत ट्रक व गोवंश असा एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कन्हान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

