नागपूर महापालिकेत भाजपची नवी ‘टीम’ जवळपास निश्चित, नीता ठाकरे महापौर, शिवानी दाणींकडे तिजोरीची चावी?

नागपूर | Navin Awaz News प्रतिनिधी

नागपूर : राजकीय वर्तुळातील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नवी टीम जवळपास निश्चित केल्याची विश्वसनीय माहिती Navin Awaz News च्या हाती लागली आहे. अधिकृत घोषणा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार असली, तरी सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार, हे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

नीता ठाकरे महापौर, संजय बालपांडे उपमहापौर?
दक्षिण नागपूरमधून निवडून आलेल्या सौ. नीता ठाकरे यांची नागपूरच्या पुढील महापौरपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. तर मध्य नागपूरचे नगरसेवक अॅड. संजय बालपांडे यांचे नाव उपमहापौरपदासाठी आघाडीवर आहे.
बालपांडे हे पद स्वीकारतील की नाही, याबाबत काहीशी साशंकता असली तरी पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Save

शिवानी दाणींकडे ‘स्थायी समिती’ची धुरा
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील तरुण नगरसेविका शिवानी दाणी यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीची चावी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड केली जाणार असल्याचे सूत्रांनी Navin Awaz News ला सांगितले.

नरेंद्र बोरकर सत्तापक्ष नेते
पूर्व नागपूर मतदारसंघातून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांची सत्तापक्ष नेता म्हणून निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग सभागृहात प्रभावीपणे करण्याचा पक्ष नेतृत्वाचा मानस आहे.

  • Save

ठळक घडामोडी

▪ राजवाडा पॅलेसमध्ये अंतिम शिक्कामोर्तब
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या नावांवर अंतिम चर्चा झाली.

▪ पाच वर्षांत चार महिला महापौर
नव्या नियोजनानुसार महापौर व उपमहापौरांचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांचा राहणार असून, पाच वर्षांत नागपूरला चार महिला महापौर व उपमहापौर मिळणार आहेत.

▪ उत्तर नागपूरकडे दुर्लक्ष?
यावेळी उत्तर नागपूरला प्रमुख पदांपासून दूर ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. येथील नगरसेवकांना परिवहन किंवा आरोग्य समितीच्या सभापतीपदावर समाधान मानावे लागू शकते.

▪ कार्यकाळ निश्चित
स्थायी समिती सभापती आणि सत्तापक्ष नेत्यांचा कार्यकाळ प्रत्येकी एक वर्षाचा राहणार आहे.

अंतिम क्षणी काही नावांमध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी हीच नावे आघाडीवर असल्याचे संकेत आहेत. २ फेब्रुवारीच्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.

📲 नागपूरच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी — Navin Awaz News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link