बांग्लादेशातील अत्याचारांविरोधात राष्ट्रीय बजरंग दलाचे कन्हानमध्ये जोरदार आंदोलन

बांग्लादेशात हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद–राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने शनिवारी (दि. २७) कन्हान येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. रामटेक विधानसभा अध्यक्ष विराज ठाकरे, शशांक मालाधारे व महामंत्री राकेश चवरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तारसा चौक ते कन्हान पोलीस ठाणे असा मोर्चा काढून आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

  • Save


यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निवेदनात बांग्लादेशात हिंदू समुदायाच्या नागरिकांची हत्या, जाळपोळ, लूटमार, धार्मिक स्थळांची तोडफोड व अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा केवळ जातीय हिंसाचार नसून एका विशिष्ट समुदायाला दहशतीखाली ठेवण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच हे प्रकार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उघड उल्लंघन असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

  • Save


या घटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने अत्याचार करणाऱ्यांना बळ मिळत असल्याचे निवेदनात नमूद आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत या मुद्द्यावर गप्प बसू शकत नाही, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले. भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा, सामाजिक स्थैर्य व लोकसंख्येच्या संतुलनाला धोका निर्माण होत असल्याची गंभीर बाब निवेदनात मांडण्यात आली.

  • Save


भारत सरकारने बांग्लादेशातील हिंदू समुदायावर होत असलेल्या अत्याचारांविरोधात तीव्र आक्षेप नोंदवून राजनैतिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव आणावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच देशात राहणाऱ्या बांग्लादेशी व रोहिंग्या नागरिकांची तातडीने ओळख, पडताळणी व हद्दपारीची प्रक्रिया जलद करण्याच्या सूचनाही देण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

  • Save


या आंदोलनात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश यादव, मंत्री राजेश बोपुलकर, उपाध्यक्ष पंकज (गोलू) सिंग, उपाध्यक्ष आर्यन राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Save

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link