कन्हान, ता. १८ जगतगुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त मराठा सेवा संघ कन्हानतर्फे अखिल कुणबी समाज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शनिवार (दि. २१) फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता डोणेकर सभागृह, जे.एन. रोड, कन्हान येथे होणार आहे.
दि. २ फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराजांची ४१८ वी जयंती, दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती आणि दि. २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबांची १५० वी जयंती या औचित्याने हा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. समाज एकत्र येऊन महापुरुषांच्या विचारांचा जागर करावा, समाजबंध दृढ व्हावेत आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवश्री मधुकर मेहकरे (राष्ट्रीय महासचिव, मराठा सेवा संघ) राहणार आहेत. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवश्री दिलीप चौधरी (सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ; जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर) उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून शिवश्री प्रकाश भाऊ जाधव (माजी खासदार, संस्थापक अध्यक्ष ग्रामोन्नती प्रतिष्ठान), शिवश्री प्रमोदजी वैद्य (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ नागपूर) आणि शिवश्री किशोर वानखेडे (संचालक, साईबाबा आश्रमशाळा टेकाडी) उपस्थित राहणार आहेत.
या स्नेहमेळाव्यात समाजातील कर्तृत्ववान व गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार असून, कुणबी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक उन्नतीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना आपल्या परिवाराचा परिचय देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे समाजातील परस्पर ओळख अधिक दृढ होईल.
“शिवराय मना-मनात, शिवजयंती घरा-घरात” या घोषवाक्यांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकावून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. “एकमेकां सहाय करू, अवघे धरू सुपंथ” या विचाराने समाज संघटित होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कन्हान परिसरातील कुणबी समाज बांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मराठा सेवा संघ कन्हानतर्फे करण्यात आले आहे.

