कन्हान, ता. ७ :
युगपरिवर्तन व मानवतावादी मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या संकल्पाने गायत्री परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड ज्योती कलश यात्रेचे कन्हान परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. गुरुदेव पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांचा दिव्य प्रकाश समाजात पोहोचवणे आणि मानवामध्ये सद्भावना, चारित्र्य व संस्कारांची जोपासना करणे, हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे.
हरिद्वार येथून आलेल्या अखंड ज्योती कलशामध्ये २४०० तीर्थांचे पवित्र जल असून, रथामधील मातीचा दीपक गेल्या १०० वर्षांपासून अखंड प्रज्वलित आहे. गायत्री परिवाराचे संस्थापक आचार्य पं. श्रीराम शर्मा आचार्य यांच्या तपश्चर्येला देखील १०० वर्षे पूर्ण झाली असून, त्यांनी २४ लाख गायत्री मंत्रांचे पुरश्चरण तसेच २४ वर्षांचा मंत्रतप करून मंत्रसाधना सिद्ध केली. आचार्यांची साधना, माता भगवती देवी शर्मा यांची तपस्या आणि अखंड दीपप्रज्वलन या त्रिवेणीला १०० वर्षे पूर्ण झाल्याने हा त्रिवेणी शताब्दी पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या शताब्दी पर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अखंड ज्योतीचे दर्शन व आशीर्वाद घेता यावेत, तसेच गायत्री परिवाराच्या सप्तक्रांती अभियानाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, या हेतूने ही कलश यात्रा गावोगावी काढण्यात येत आहे.
मंगळवार (दि. ६) व बुधवार (दि. ७) जानेवारी रोजी कन्हान, वराडा, टेकाडी व केरडी परिसरात ही अखंड ज्योती कलश यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडली. विविध ठिकाणी भाविकांनी फुलांची उधळण करत रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी अखंड ज्योती कलशाची विधीवत पूजा-अर्चा करून भाविकांनी दर्शन घेतले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक भरत सावळे, श्यामबाबू पिपलवा यांच्यासह प्रशांत मसार, शुभम बावनकर, निखिलेश चकोले, आयुष संतापे, भीम ठाकूर, झोपटकर गुरुजी, प्रकाश तिवारी, वराडा ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील जामदार, अमित घारड, संजय नेवारे, मारोती नागमोते, शुभम नागमोते, उमेश मेश्राम, गौरीशंकर मरस्कोल्हे, शुभम पुंड, हर्षल नेवारे, शिशुपाल घोडमारे, हेमंत गिऱ्हे, बाळकृष्ण पारधी, डोनबाजी चरडे, ईश्वर टाले यांच्यासह सुनंदा चरडे, सुवर्णा टाले, शुभांगी घारड, वंदना जामदार, हर्षा चिखले, इंदिरा नागमोते, मेघा टाले आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड ज्योती कलश यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, समाजात सद्विचार, संस्कार व अध्यात्मिक जागृती निर्माण होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

