राजे फाउंडेशनतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप

येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभानिमित्त शाळेच्या वतीने सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत असलेल्या राजे फाउंडेशनला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्या अनुषंगाने राजे फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना कार्डबोर्ड, पेन-पेन्सिल तसेच इतर आवश्यक साहित्यांचा समावेश असलेल्या संपूर्ण शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.

  • Save

कन्हान,ता.०६

हा उपक्रम राजे फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कन्हान नगरपरिषदेचे नगरसेवक केतनजी भिवगडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोलाची मदत व्हावी, त्यांना पुढील अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी आणि आत्मविश्वास बळकट व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितेश तपासे (लेखापाल, कन्हान नगरपरिषद), पवार साहेब (लेखाविभाग, कन्हान नगरपरिषद), डॉ. अतुलजी बर्वे, नगरसेविका पूनम आशिष राठी तसेच नगरसुधार समितीच्या अध्यक्षा नाईक मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  • Save

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीणकुमारजी साबरे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. शैक्षणिक किट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि पुढील शिक्षणासाठी सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.

राजे फाउंडेशनच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link