कन्हाननगरीत भक्तीचा जागर : श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव उत्साहात

कन्हान शहर व परिसराचे आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिवाडे ले-आऊट (पांदण रस्ता) येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात यंदाचा प्रगट दिन उत्सव भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कन्हानमधील एकमेव व अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरात दरवर्षी राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून दर्शनासाठी उपस्थित राहतात.
तिवाडे ले-आऊट येथील श्री संत गजानन महाराज मंदिर हे केवळ पूजास्थान नसून कन्हान शहराच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक बनले आहे. मंदिरातील शिस्तबद्ध आयोजन, भक्तिमय वातावरण आणि पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण विदर्भातून भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “शेगावच्या राण्याचे चैतन्य कन्हानच्या पावन भूमीत अवतरणार असून, या भक्ती सोहळ्यातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

  • Save


यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध बालकीर्तनकार व ग्रामगीता प्रचारक कुमारी वेदांती मुळेकर यांचे भक्तीप्रबोधनात्मक कीर्तन. शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता हे कीर्तन होणार आहे. या कीर्तनातून भक्तीबरोबरच समाजजागृती, नैतिक मूल्ये आणि संस्कारांचा संदेश दिला जाणार आहे.
प्रगट दिनानिमित्त मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य दिव्य भक्ती सोहळ्याला कन्हान व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन विनीत श्री संत गजानन महाराज सेवा मंडळ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link