शिक्षकांच्या हक्कासाठी चोवीस तास सज्ज; कन्हान अधिवेशनात शिक्षक परिषदेचा आक्रमक सूर
दिवसेंदिवस शिक्षकांच्या समस्या वाढत असून त्या सोडविण्यासाठी शिक्षक परिषद ही संघटना सातत्याने व निरंतर लढा देत आहे. शिक्षकांच्या हक्काच्या लढ्यासाठी माजी शिक्षक आमदार नागो गाणार हे चोवीस तास सज्ज असून ते सदैव आघाडीवर असतात, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मिनानाथ सातपुते यांनी केले.
कन्हान येथील डोणेकर सभागृहात आयोजित राज्य शिक्षक परिषद नागपूर ग्रामीण जिल्हा अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी कन्हान नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे, माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर, माजी शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख सौ. पूजा चौधरी, नागपूर विभागीय अध्यक्ष अजय वानखेडे, कार्यवाह सुभाष गोतमारे, विभाग महिला आघाडी प्रमुख सौ. मनीषा कोलारकर, उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, संघटनमंत्री रामदास गिरटकर, नागपूर शहर अध्यक्ष राजेंद्र पटले, कार्यवाह प्रमोद बोढे, कोषाध्यक्ष सुनील शेळके, शहर महिला प्रमुख डिंपी बजाज, स्वीकृत नगरसेविका सुनंदा दिवटे, विनायक इंगळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
सातपुते म्हणाले की, अनेक शिक्षक संघटना कार्यरत असल्या तरी त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यालय नाही. मात्र शिक्षक परिषदेचे स्वतंत्र कार्यालय असल्याने समस्याग्रस्त शिक्षक थेट संपर्क साधू शकतात. शासनाने शिक्षकविरोधी निर्णय वा परिपत्रके काढल्यास त्याविरोधात सर्वप्रथम आवाज उठविण्याचे काम शिक्षक परिषद करते, त्यानंतर इतर संघटना जागृत होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिक्षकांवर लादण्यात आलेली अनावश्यक व बेकायदेशीर ऑनलाईन कामे तात्काळ बंद झाली पाहिजेत, अशी मागणी करत शिक्षणाधिकारी कार्यालयातील संथ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अधिकारी तुरुंगात जाऊनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आजही पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचे चित्र असून, वेळ पडल्यास अशा प्रवृत्तीविरुद्ध शिक्षक परिषद गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी फाईल्स वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्यांचा निपटारा होत नसणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. या व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना माजी आमदार नागो गाणार यांनी सांगितले की, १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागू होणार नाही. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनाच टीईटी बंधनकारक आहे. शिक्षक समाज व देश घडविण्याचे काम करतो, त्यामुळे तो सदैव आनंदी असणे आवश्यक आहे. शिक्षकांना अशैक्षणिक व ऑनलाईन कामे देऊ नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
कार्यक्रमात राजेंद्र शेंद्रे, शरद डोणेकर, सौ. पूजा चौधरी, अजय वानखेडे, सुभाष गोतमारे, मधुकर मुप्पीडवार व नागपूर विभागाचे कार्यालयीन मंत्री सुधीर वारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह राजीव तांदुळकर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री नखाते यांनी, तर आभार हेमराज फाटे यांनी मानले.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी पारशिवणी तालुकाध्यक्ष प्रवीणकुमार साबळे, कार्यवाह अमित मेंघरे, कोषाध्यक्ष सुनील लाडेकर, सौ. कल्पना सुरदुसे, प्रशांत वैद्य, भुणेश्वर बोबडे, निसर्ग पवार, धनंजय जिचकार, नितीन आष्टणकर, सुदर्शन अंगडलवार, शंकर गोमासे, भोजराज सोनसरे, सौ. सारिका गाणार यांच्यासह शिक्षक परिषदेच्या पारशिवणी तालुका पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

