महिला सन्मान, मातृत्वाचा आदर आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी प्रसंग मंगळवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुभवास आला. जिल्हाधिकारी मा. श्री. विपिनजी इटनकर यांनी आपल्या संवेदनशील व मानवतावादी भूमिकेतून समाजासमोर एक आदर्श उदाहरण सादर केले.
कांद्री नगरपंचायत, प्रभाग क्रमांक ६ येथून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सौ. शुभांगी पवन कुंभलकर यांना गट स्थापनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे बोलावण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे, त्यांच्या प्रसूतीला अवघा एक आठवडा झाला असतानाही, जनतेने दिलेल्या विश्वासाला आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदारीला प्राधान्य देत त्या आपल्या केवळ सहा दिवसांच्या बाळासह कार्यालयात उपस्थित राहिल्या.
ही परिस्थिती लक्षात येताच जिल्हाधिकारी मा. श्री. विपिनजी इटनकर यांनी तत्काळ संवेदनशीलता दाखवत स्वतः आपल्या केबिनमधून बाहेर येऊन सौ. शुभांगी कुंभलकर यांचे आवश्यक हस्ताक्षर घेतले. त्यामुळे प्रसूतीनंतरच्या महिलेला अनावश्यक त्रास होऊ नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली.
हा प्रसंग केवळ प्रशासकीय कामकाजापुरता मर्यादित न राहता, महिला सन्मान, मातृत्वाचा आदर आणि लोकशाहीतील लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यभावनेचे प्रतीक ठरला आहे. लोकसेवा आणि प्रशासन यांच्यातील मानवी संवेदनशीलतेचा हा दुर्मिळ संगम असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
जिल्हाधिकारी इटनकर यांची ही भूमिका प्रशासनातील मानवी दृष्टिकोन अधोरेखित करणारी ठरली, तर सौ. शुभांगी पवन कुंभलकर यांची लोकप्रतिनिधी म्हणून दाखवलेली निष्ठा व कर्तव्यभावना समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.

