पारशिवनी तालुक्यातील जुनी कामठी ग्रामपंचायत क्षेत्रातील वार्ड क्रमांक २ येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रकरणाकडे सरपंच सविता इरपाते आणि ग्रामसेविका रजनी कुंचलवार यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सांस्कृतिक भवनाचे नाव बदलून ‘परमात्मा एक व्यसनमुक्ती भवन’ असे करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या मुद्यावर ग्रामसभेत गावकऱ्यांनी आक्षेप नोंदवत भवन सर्व समाजाच्या उपयोगासाठी खुले ठेवावे, अशी मागणी केली होती. सरपंचांनी आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात काहीच कृती झाली नाही.
पूर्वीच्या ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी (DMF) अंतर्गत सांस्कृतिक भवन बांधण्याचा ठराव केला होता. त्या आधारे इमारत उभारण्यात आली. मात्र, सद्यस्थितीत भवनाचे नाव आणि ताबा बदलल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत ग्रामपंचायतीकडे नावबदलाची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे समोर आले आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाची अवहेलना; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गावातील नागरिकांनी या बाबत पालकमंत्री बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांस्कृतिक भवन गावकऱ्यांसाठी खुले करण्याची मागणी केली होती. बावनकुळे यांनी आदेश दिल्यानंतरही वर्षभरात कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अलीकडेच माजी सरपंच व सदस्य राहुल ढोके, भुषण इंगोले, ज्ञानेश्वर ऊके, चिंतामण शेंडे, राम जुनघरे, विठ्ठल ऊके, उकुंदराव देवगडे आदी ग्रामस्थांनी पुन्हा पालकमंत्री व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.
त्यांनी पंचायत समितीचे बीडीओ सुभाष जाधव आणि सचिव कुंचलवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कारवाई का झाली नाही याबाबत विचारणा केली.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीअंतर्गत उभारलेले हे भवन शासकीय मालकीचे असल्याने ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणे अपेक्षित आहे, असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. भवनावरील ताबा संबंधितांकडून काढून ते ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ग्रामस्थांचे लक्ष आता सरपंच आणि सचिव पुढील कारवाई किती लवकर करतात, याकडे लागले आहे.

