कन्हान : तालुक्यातील वराडा गावात शेतकरी वसंता बोढारे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गोऱ्याची बिबट्याने शिकार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पिडीत शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बुधवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी शेतकरी वसंता बोढारे यांनी नेहमीप्रमाणे जनावरे गोठ्यात बांधून घरी गेले होते. गुरुवार (दि. ३० ऑक्टोबर) रोजी सकाळी जनावरांची देखभाल करण्यासाठी गेले असता, दोन वर्षांचा गोरा कोठ्यात दिसून आला नाही. शोध घेतला असता, गोठ्यापासून काही अंतरावर नाल्याजवळ गोऱ्याचा अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला.
याची माहिती बोढारे यांनी वराडा सरपंच सुनिल जामदार आणि घाटरोहणा सरपंच किशोर बेहुणे यांना दिली. त्यांनी तत्काळ पारशिवनी वनविभागातील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर क्षेत्र सहायक, वनरक्षक व पीआरटी पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पाहणी केली.
बिबट्याने शेतकरी बोढारे यांच्या गोऱ्याची शिकार केल्याने सुमारे ₹३०,००० चे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वराडा सरपंच सुनिल जामदार आणि घाटरोहणा सरपंच किशोर बेहुणे यांनी केली आहे.
या घटनेनंतर वराडा, घाटरोहणा, एंसबा आणि पटगोवारी परिसरात वन्यप्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडावे आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन क्षेत्र सहायक एस. एम. वासनिक यांनी केले आहे.

