कन्हान : –रक्तदान करून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तीव्र संताप; राज्य सरकारचे लक्ष वेधले माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांचे राज्यात गाजत असलेल्या ‘आठवण कर्जमुक्ती’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष नागपुर जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान करून रक्ताने सही करून स्वतःच्या रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री महोदयांना सादर केले. जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी स्वीकारले.
राज्यातील सामान्य जनता आणि कर्जबाजारी बांधवांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” अशी आक्रमक भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.
निवेदनात प्रमुख मागण्या सर्व थकीत कर्जदारांची सरसकट कर्जमुक्ती करावी, कर्जमाफीच्या प्रक्रियेतील जाचक अटी रद्द कराव्यात आणि कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना सन्मानाने पुन्हा अर्थपुरवठा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष रजनीकांत अतकरी व कॅप्टन सतिश बेलसरे म्हणाले की, “सरकारने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कर्जमुक्तीची अंमलबजावणी करावी. जर या रक्ताच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही, तर आगामी काळात जिल्हाभर जेलभरो आंदोलन किंवा तीव्र रस्ता रोको करण्यात येईल.”
या आंदोलनात देविदास तडस, सुर्यभान फरकाडे, शैलेश झेंडे, आकाश भगत, हिमांशु तागडे, विशाल अतकरी, नितेश भरणे, राजु राऊत, मोरेश्वर संतापे, लोकेश डहाके, मोंटु भोयर, सुवर्णा रामापुरे, भूमिका भरणे, निलिमा फरकाडे, राधिका झेंडे, सरोज गौरखेडे, मनोज पाली सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या अनोख्या ‘रक्ताच्या स्वाक्षरी’ आंदोलनाची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात सुरू असुन प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

