रामनवमी निमित्त कन्हानहून शिर्डीकडे साई पालखीचे भक्तिमय प्रस्थान

कन्हान,ता.२८ रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त कन्हान नगरीतून साईनामाचा अखंड गजर करत शिर्डीकडे निघणाऱ्या साई पालखी पदयात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान यांच्या वतीने आयोजित ही यात्रा यंदा १६ व्या वर्षात प्रवेश करत असून गुरुवार, ५ मार्च रोजी दुपारी इंदिरानगर येथील साई मंदिरातून भव्य मिरवणुकीने प्रस्थान होणार आहे.

  • Save

ढोल-ताशांचा निनाद, टाळ-मृदुंगाचा गजर आणि “ॐ साईराम”च्या जयघोषात पालखी मार्गस्थ होणार आहे. भगव्या पताका, फुलांनी सजविलेली पालखी आणि साईबाबांच्या आकर्षक प्रतिमेने परिसर भक्तिमय झाला आहे. “तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन” या भावगीताच्या ओव्यातून साईभक्तांची निष्ठा आणि समर्पण व्यक्त होत आहे.

  • Save

कन्हान ते शिर्डी हा सुमारे तीन आठवड्यांचा प्रवास नागपूर, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना व छत्रपती संभाजीनगर मार्गे पूर्ण होणार आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी स्थानिक ग्रामस्थ व मंडळांकडून यात्रेकरूंचे स्वागत, नाश्ता-जेवण व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रेमुळे ग्रामीण भागात धार्मिक उत्साहाबरोबरच सामाजिक ऐक्याची भावना दृढ होत असल्याचे चित्र आहे.

  • Save

पालखीची दिनचर्या अत्यंत शिस्तबद्ध ठेवण्यात आली असून पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक, दुपारी मध्यान्ह आरती, सायंकाळी धूप आरती आणि रात्री शेजारती असे नियमित कार्यक्रम होणार आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साई सच्चरित्र साप्ताहिक पारायणास प्रारंभ करण्यात येणार असून त्यातून आध्यात्मिक चिंतनाचा संदेश दिला जाणार आहे.

  • Save

२६ मार्च रोजी पालखी शिर्डीत पोहोचल्यानंतर खंडोबा मंदिर ते समाधी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येईल. समाधीस्थळी रामजन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ व महाप्रसाद वितरण होणार आहे. त्यानंतर पालखी पुन्हा कन्हानकडे परतीचा प्रवास करेल.

  • Save

गेल्या पंधरा वर्षांची अखंड परंपरा जपत साईभक्तांचा हा श्रद्धायात्रेचा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे. साईनामाच्या गजराने कन्हान परिसर दुमदुमला असून या पालखी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link