पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभर राबविण्यात आलेली स्वच्छ भारत मोहिम स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करणारी ठरली असली, तरी कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील वास्तव या मोहिमेच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासणारे असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे.
कन्हानमध्ये नाल्यांची दुरवस्था; नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ
कन्हान | प्रतिनिधी
कन्हान नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये नाल्याऐवजी उघड्या सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल प्रचंड वाढले आहेत. या भागात साचलेले घाण पाणी थेट नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत असून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे, या परिसरात बांधकाम सभापती स्वतः वास्तव्यास असतानाही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित सभापती पदावर येण्यापूर्वी येथे मोटरच्या सहाय्याने सांडपाण्याचा निचरा केला जात होता. मात्र पद मिळाल्यानंतर नागरिकांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. जनतेच्या समस्या केवळ राजकीय सोयीपुरत्याच होत्या का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या परिसरात प्रामुख्याने अत्यंत गरीब कुटुंबे वास्तव्यास असून, बहुतांश नागरिक रोजंदारीवर अवघे २०० रुपये कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. साचलेल्या सांडपाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून, गरीब असल्यामुळेच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, जर येथे एखादा प्रतिष्ठित व्यक्ती किंवा बडा प्रभाग असता, तर केव्हाच स्वच्छतेची कामे पूर्ण झाली असती.
हीच स्थिती कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील बावनकुडे साहेबांच्या निकटच्या परिसरातही पाहायला मिळत आहे. याच भागात पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या भागाचे उपाध्यक्ष स्वतः स्वच्छता व आरोग्य सभापती असतानाही परिस्थितीकडे डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
कन्हानच्या नागरिकांचे जीव इतके स्वस्त आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, एकीकडे लोकप्रतिनिधी मस्त आणि दुसरीकडे जनता त्रस्त, असे विदारक चित्र सध्या कन्हानमध्ये पाहायला मिळत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर इशारा विनय यादव, माजी नगरसेवक, नगरपरिषद कन्हान यांनी दिला आहे.
आरोपाला खंडण
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नगरसेवक व बांधकाम सभापती केतन भिवगडे (न.प. कन्हान) यांनी सांगितले की,
“प्रभाग क्रमांक ४ मध्ये रेल्वे परिसरालगत असलेल्या घरांच्या मागील बाजूस दरवर्षी पावसाळ्यात सांडपाणी साचून डबक्याचे स्वरूप निर्माण होते. मी स्वतः त्या परिसरातील रहिवासी असल्याने परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी यापूर्वीही मोटरच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. सांडपाणी व कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद गंभीर असून, बांधकाम विभागाचे अभियंता वाघ यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आवश्यक कामे हाती घेण्यात येतील.”

